रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अद्याप परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत असून, व्यापारी कवडीमोल भाव देऊन त्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत.
सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी खरिपाला पर्याय म्हणून रब्बी हंगामात धानपिकाची लागवड केली. या धानाची काही दिवसांपूर्वी कापणी झाली असून बहुतेक शेतकऱ्यांनी मळणीसुद्धा केली आहे. परंतु अजूनही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू होण्याचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण लक्षात घेऊन खासगी व्यापाऱ्यांना धान विकणे सुरू केले आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन प्रति क्विंटल १४०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, शेतकऱ्यांना या रकमेतून कर्जाची परतफेड अन् दैनंदिन खर्च करणे कठीण झाले आहे. दरम्यान, खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट
खरिपातील विकलेल्या धानाची रक्कम वेळेत मिळाली नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज निर्धारित वेळेत भरता आले नाही. परिणामी, अधिक व्याज द्यावे लागणार आहे. याचाही फटका बसणार आहे.
प्रभु लिल्हारे, शेतकरी रावणवाडी
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे आम्हाला खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. हे व्यापारी अल्प भाव देऊन आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
सोहिद कोहारे, मुरपार