गोंदिया : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधून प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीसंदर्भात घोळ झाल्याचा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. प्रथमदर्शनी चौकशीतून हे समोर आले आहे. ज्यामध्ये आयडीनुसार ज्या लाभार्थ्यांना लाभ द्यायचे होते त्यांना लाभ न देता दुसऱ्याच व्यक्तीला लाभ देण्यात आल्याचे समोर आले आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये असे बरेच प्रकरण घडले आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अधिक लाभार्थी असलेल्या ५ ग्रामपंचायतींची निवड करून सखोल चौकशी करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेत अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नसून या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (दि.१८) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी नयना गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, न.प. मुख्याधिकारी करण चव्हाण, सर्व खंडविकास अधिकारी, तिरोडा कृउबास सभापती चिंतामण रहांगडाले, भाजप जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, जयंत शुक्ला, गुड्डू कारडा, गोल्डी गावंडे, विनोद चांदवानी, अशोक जयसिंघानी, तिजेश गौतम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार मेंढे यांनी, प्रधानमंत्री आवास योजनेची कामे वेगाने व्हावी, याकरीता येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर कराव्या. यासोबतच जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पासपोर्ट कार्यालयाचे काम थांबून आहे. त्यातील अडचणी दूर करून कार्यालय त्वरित सुरू करण्यात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेशी संबधित असलेल्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासंदर्भात कापण्यात आलेल्या झाडांच्या बाबतीत चौकशी करावी. सिंधी समाजातील पट्टे वाटपामध्ये भूखंडाच्या आखिव पत्रिकेसंदर्भातील प्रकरण सोडविण्यात यावे, आदी विषयांवर चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
-------------------------
एकाच व्यक्तीला दोनदा लाभ
घरकूल योजनेत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे सांगत खासदार मेंढे यांनी पेन्शनर्सना लाभ देण्यात आले असल्याचा प्रकारही पुढे आणला. तर काही बाबतीत आयडी एकाची, मंजूर यादीत नाव दुसऱ्याचे तर लाभ तिसऱ्यालाच मिळाला आहे असे प्रकार घडल्याचेही सांगीतले. लाभ घेऊन बांधकाम न करणारे प्रकरण असून एकाच व्यक्तीला दोन वेळा लाभ देण्याचे प्रकरण घडलेले आहेत त्यांचीही चौकशी करण्याचे निर्देश दिले.