गोंदिया : पाणी व स्वच्छता विभाग हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने, या विभागाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी जिल्ह्याच्या भेटीदरम्यान दिले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पाहणी व आढावासंदर्भात दिनांक १९ व २० जुलै रोजी नागपूर विभागातील नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा त्यांचा नियोजित दौरा होता. या अनुषंगाने मंगळवारी (दि.२०) त्यांनी जिल्ह्य़ातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश राठोड, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी राठोड, सडक-अर्जुनी गटविकास अधिकारी खुणे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रहमतकर, आयईसी सल्लागार उखळकर, शालेय स्वच्छता सल्लागार रहांगडाले यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाजन यांनी सुरुवातीला अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतला भेट देऊन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामासंदर्भात तपासणी केली. त्यानंतर, चान्ना येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन रमा महिला ग्रामसंघामार्फत चालविण्यात येणाऱ्या गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, गांडूळ खत प्रकल्प हे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यान्वित झाल्याने गावातील महिलांना या निमित्ताने रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. याबाबत महाजन यांनी कौतुक करून, त्याचप्रकारे इतरही गावांत अशा प्रकारे प्रकल्प उभारून, बचत गटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
-------------------------
कामे वेळेत पूर्ण करा
महाजन यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील काही गावांत भेट देऊन तेथील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत कामांची पाहणी केली, तसेच ही कामे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जिल्ह्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, जल जीवन मिशनअंतर्गत नळ जोडणी, तसेच सार्वजनिक शौचालयांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिले.