राजकुमार बडोले : पाटेकुर्रात जलयुक्त कामाचे भूमिपूजन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सन २०१९ पर्यंत राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भात खाचरे दुरूस्ती, नाला खोलीकरण, बोडी नुतनीकरण, साठवण बंधाऱ्यांची कामे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी समृध्द कसा होईल, यासाठी या अभियानातून शेतीला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथे १२ जून रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या गाव तलावांची दुरूस्ती आणि बोडी दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य राजेश कठाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. भुमेश्वर पटले, वसंत गहाणे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी कोटांगले, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, सरपंच केशवराव भलावी, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य चेतन वडगाये, उपसरपंच निर्मला घरत, पोलीस पाटील ललीता कवरे, ग्रामपंचायत सदस्य वनिता कटरे, भूमिता पारधी, रेवता वाघाडे, देविलाल कटरे, गुनीलाल रहांगडाले, अमित चकाटे व विजय सोनवणे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले म्हणाले, सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाटेकुर्रा या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून पाटेकुर्रात ६९ लाख रूपयांची २६ कामे घेण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात विहिरी तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मागील वर्षीपासून धडक सिंचन विहिरी तयार करण्याच्या विशेष कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली असून यामधून जिल्ह्यात १ हजार १०० विहिरी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सडक-अर्जुनी पंचायत समितीला ३०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना देण्यासाठी गावच्या ग्रामसभेने, ग्रामपंचायतने संबंधित योजनांचे परिपूर्ण भरलेले अर्ज ग्रामसेवकाच्या माध्यमातून पंचायत समितीपर्यंत पोहोचविणे व ते मंजूर करून घेणे हे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाचे काम असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्याचा चांगला वापर करता आला पाहिजे. पाटेकुर्रा येथे सभा मंडपाची मागणी जुनीच असून यासाठी ग्रामपंचायतला आजपर्यंत जागा उपलब्ध करु न दिलेली नाही. त्यामुळे सभा मंडपाचे काम होवू शकले नाही. राज्य शासनाने ३० हजार कोटी रूपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे करण्यात येणार असल्यामुळे विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाटेकुर्रा गावातील जे शेतकरी सिंचन विहिरीसाठी अर्ज करतील त्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक सरपंच केशवराव भलावी यांनी मांडले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार पं.स. सभापती रंगारी म्हणाल्या, पालकमंत्री बडोले यांच्या पुढाकारामुळे जलयुक्तची कामे पाटेकुर्रा येथे होत आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या कामातून गावातील लोकांना रोजगार मिळणार असून त्या माध्यमातून विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाव तलाव व बोडीचे नूतनीकरण यावेळी तालुका कृषी अधिकारी तुमडाम व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. पटले यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते गाव तलावाच्या कामाचे व शेतकरी जगन्नाथ रहांगडाले यांच्या शेतात बोडी नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
जलयुक्त शिवारातून शेतीला प्राधान्य
By admin | Published: June 14, 2017 12:35 AM