तिरोडा : जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणातील उद्रेकाचा झालेला कहर बघता शासनाची आरोग्य व्यवस्था अडचणीत आलेली होती. तसेच खासगी नर्सिंग होममध्ये पेशंटला भर्ती करण्यास तयार नव्हते. अशा गंभीर परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. एवढ्या लवकर कोरोना नियंत्रणात आला कसा? गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लक्ष आहे.
शासनाच्या पातळीवर चाचण्या १४७८४६ लोकांच्याच झाल्या. जवळपास ११ लक्ष लहानमोठ्या लोकांच्या चाचण्या झाल्या नाहीत. परंतु ज्यांच्यामध्ये प्रकृती बिघडण्याचे प्रमाण होते. सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे होती. बऱ्याच लोकांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. परंतु या सर्व बाबींवर गावपातळीवर काम करणारे खासगी डॉक्टर या लोकांनी जिवाची पर्वा न करता या पेशंटला औषधोपचार करून जीव वाचविण्याचे काम केले आहे. तसेच रुग्णाला येणारा खर्च या डॉक्टरांपासून अतिशय कमी आला. परंतु हे डॉक्टर खासगी आहेत. त्यांच्या संघटना नाहीत व त्यांना सरकारी मान्यता नाही म्हणून त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. त्यांच्याकडे शासनाची वक्रदृष्टी असते. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यास या डॉक्टरांचीसुध्दा मोठी मदत झाली. या दृष्टीने या गावपातळीवरील डॉक्टरांनासुद्धा मार्गदर्शन करावे. ज्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देताना त्यांची मदत होईल, असे माजी आ. दिलीप बन्सोड यांनी म्हटले आहे.