रावणवाडी : तालुक्यातील अनेक गावांतील सार्वजनिक बोअरवेल बंद पडल्या आहेत, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने, भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशातच मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात टायफाइड आजाराची साथ सुरू आहे, तर दुसरीकडे गावकऱ्यांना सध्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील बऱ्याच गावांमधील सार्वजनिक बोअरवेल बंद आहेत, तर गावातील विहिरींनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. काही गावांतील नागरिक शेतातील विहिरीचे पाणी आणून आपली तहान भागवित आहे. मात्र, काही ठिकाणी दूषित स्रोतांचे पाणी पित असल्याने, गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले, तर काही गावांमध्ये सध्या कोरोनासह टायफाइड आजाराची साथ सुरू आहे. त्यामुळे एकाच वेळी गावकऱ्यांना पाणीटंचाई आणि साथरोग अशा दोन्ही संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बंद पडलेले बोअरवेल अद्यापही सुरू करण्यासाठी पंचायत समितीच्या तांत्रिक विभागाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या कायम असून, महिलांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.