वरशोध मोहीम : उपवर-वधूंची सोयरिकही झाली दूरकेशोरी : जानेवारी महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत गावा-गावात शंकरपट भरवून शेतकरी वर्ग पटशौकिन व सामान्य माणसांच्या आनंदावर न्यायालयाच्या निर्णयामुळे विरजण पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शंकर पट मोडल्याने शंकरपट आता फक्त इतिहासाच्या पानावरच असणार आहे. त्यामुळे उपवर वधुवरांची सोयरीक करण्यास पालकांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या भागात अनेक गावामध्ये पट भरविण्याची परंपरा होती. शेतकरी वर्ग, पटशौकिन आणि सामान्य माणसे देखील पटाच्या निमित्ताने पट असलेल्या गावात दाखल होत असत. या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, आबालवृध्दांसाठी बैलांचे पट एक प्रकारचे आनंद पर्वणी असायची. पटाचे औचित्य साधून उपवर वधूवरांची सोयरीक सुध्दा मोठ्या प्रमाणात जुळून येत होती. पट या भागासाठी सामाजिक संबंधाकरीता महत्वाचा दुवा समजल्या जात होते. पटावर बंदी आल्यामुळे अलीकडे या भागातील गावांमध्ये जलशाची क्रेज वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या जलशाची आवड फक्त तरुणांमध्ये दिसून येते. वयस्कांना जलशा आवडत नाही. त्यामुळे त्यांची उपस्थिती दिसत नाही. परिणामी उपवरवधुवरांची सोयरीक करण्यास पालकांना यश येत नाही. त्यांना खूप फिरावे लागते. पूर्वी पटामुळे दुरवरून व्यावसायीक यायाचे गावाला जणू यात्रेचे स्वरुप येत होते. पटातून शेतीचे अवजारे गृहोपयोगी वस्तू घेण्यात लाखोंची उलाढाल होत असे. घरांची साफसफाई पाहुण्यांची सरबराई यासाठी लोक आपली आर्थिक बाजू तयार ठेवण्यास पंधरा दिवसापासून तयारीला लागायचे, मात्र अलीकडे बैलाची पट इतिहास जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. (वार्ताहर)
पटांअभावी वधुपित्यांची अडचण
By admin | Published: February 25, 2016 1:43 AM