नरेश रहिले
गोंदिया : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने बैल किंवा रेड्यांच्या माध्यमातून शेती करणे आता शेतकरी पसंत करीत नाही. त्यामुळे शेतीच्या कामात उपयोगात न येणाऱ्या बैलांना पोसणे शेतकऱ्यांना कठिण झाले आहे. यानंतर बैलांची संख्या कमी करण्यासाठी व दूध देणाऱ्या गायींचीच संख्या वाढविण्यासाठी आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमाला गोंदियात सुरूवात झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी दिली.
शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींची कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा उच्च अनुवांशिकतेच्या कालवडी यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त ८० रुपयांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. फिरते पशुचिकित्सालयद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत या उपक्रमांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचविली जात आहे.
..........
संगोपनाचा खर्च होणार कमी
सन २०१७ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये निसर्ग नियमानुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादींचे प्रमाण होते. राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामध्ये वाढ झाल्याने शेती कामाकरिता उपयोगी असलेल्या बैलांची आवश्यकता कमी झाली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च सोसणे भाग पडत होते. ते आता अत्यल्प होणार आहेत.
...........
दुग्ध उत्पादन वाढविण्यावर भर
नर वासरांची पैदास न्यूनतम पातळी ठेवण्याचे हेतूने पारंपरिक वीर्यमात्रा लिंग विनिश्चित वीर्यमात्रा या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्य मात्रांचे क्षेत्रीय स्तरावर गाई म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होईल. क्षेत्रीय स्तरावर गाई-म्हशींचा कृत्रिम रेतनासाठी वापर करणे शक्य होत नव्हते, पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास विभागाने ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती करून भविष्यात दुग्ध उत्पादन वाढविणार आहेत.