महिला दिन विशेष
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर अधिकारी झाले खरे; पण तिथे मन रमेना. सामाजिक बांधिलकी व सेवाकार्यात सहभागी होऊन दायित्व पार पाडण्याचे शल्य नेहमी मनात बोचायचे. प्रयत्न सुरूच ठेवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुन्हा दिली व अखेर मनासारखे बालविकास खाते मिळाले. या पदाला शोभेसे असे कार्य करून जनसामान्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करेन. असा दुर्दम्य विश्वास अर्जुनी मोरगावच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका किरणापुरे यांनी महिला दिनानिमित्त घेतलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.
सामान्य कुटुंबात जन्मलो. वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात होते. वेतन फारसे नव्हतेच. तरीसुद्धा अगदी बालपणापासूनच अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. मनाशी खूणगाठ बांधली व प्रवास सुरू झाला. प्राथमिक शिक्षण गोंदियाच्या सरस्वती शिशू मंदिरातून पूर्ण केले. सरस्वतीबाई महिला विद्यालयातून ९४ टक्के गुण घेऊन एसएससी उत्तीर्ण केले. महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयातून ८६ टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाले. डी.बी. सायन्स महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत विज्ञान पदवीधर झाले. पुढे शिक्षण घेण्यापेक्षा पुण्याला जाऊन एमपीएसची तयारी सुरू केली. तब्बल तीन वर्षे अभ्यास केला. यात वडिलांनीही मोठ्या धैर्याने माझ्या प्रयत्नांना साथ दिली. अखेर २०१९ ला माझ्या प्रयत्नांना यश लाभले. २०१९ ला माझी नागपूर येथे राज्य कर निरीक्षक पदावर नियुक्ती झाली. पहिले स्वप्न पूर्ण झाले.
आपण ज्या वातावरणात रमलो. जनसामान्यांचे दुःख जवळून बघितले, त्यांची सेवा माझ्या पेशातून घडणार नव्हती, याचे शल्य नेहमी बोचत होते. नोकरीत फारसे मन रमत नव्हते. आपण सामान्य माणसांशी संबंधित सेवाकार्यात जायचे, हा निश्चय केला. नेमके त्याचवेळी बालविकास प्रकल्प अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आली. ही परीक्षा दिली. यातसुद्धा यश प्राप्त झाले. या पदासाठी माझी निवड झाली व मला गृहजिल्ह्यातीलच अर्जुनी मोरगाव तालुक्यात नियुक्ती मिळाली. फेब्रुवारी २०२० मध्ये मी अर्जुनी मोरगाव येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाले. या नियुक्तीचा मला प्रचंड अभिमान आहे. अगदी मनासारखे झाले. बालविकास घडवायचा. अंगणवाडी हा बालविकासाचा पाया असतो. पाया मजबूत असेल, तर सर्वांगीण विकास घडतो. भावी पिढी ही सुजाण असली पाहिजे. त्यासाठी बालविकासाचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहेत.
......
आधी निर्धार करा, जीवनाचे ध्येय ठरवा
या महिला दिनाच्या निमित्ताने मी युवा पिढीला संदेश देऊ इच्छिते की, आधी निर्धार करा. जीवनाचे ध्येय ठरवा. त्या दिशेने मार्गक्रमण करताना वाटेत अनेक काटे येतील. याला घाबरून जाऊ नका. अपयश पदरी पडले तरी खचून जाऊ नका. धैर्याने पुढे वाटचाल करा. अपयश हीच यशाची पायरी असते, असे म्हणतात ते अगदी खरे आहे. ठेच लागल्यावरच मनुष्य सावध होतो. मेहनत कुठेही कमी पडू देऊ नका. मनात जिद्द असायलाच पाहिजे. मी ग्रामीण भागातील आहे. शहरी मुलांचाच नागरी सेवेत अधिक भरणा असतो. आपला क्रमांक लागेल की नाही, अशी संकुचित वृत्ती ठेवू नका. आकाशाला गवसणी घालण्याचे कसब स्वतःत निर्माण करा. यश नक्कीच पदरी पडेल. युवतींनो मोठे स्वप्न बघा, असा मौलिक संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.