बिरसी-फाटा : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावावर प्रतिबंध लावण्याकरिता प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळे मात्र व्यावसायिक संकटात सापडले असून छोट्या दुकानदारांना आपल्या व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडला आहे .
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत चालली असून अनेकांचे प्राणही गेले आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. याचा फटका व्यावसायिकांना बसत असून चहा, पानटपरी, चाट व सलून सारखे लहान-सहान व्यवसाय करणारे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. कुटुंबातील सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक चिंतेत पडले आहे. ज्याप्रमाणे शासनाद्वारे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे छोट्या दुकानदारांनाही निर्धारित वेळ ठरवून देत दुकान उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती हलाखीची होती. आता यंदाही तिच स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी छोटे व्यावसायिक संकटात अडकले असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशी चिंता त्यांना सतावत आहे.