ग्रामसभा ग्रुपचा दावा : सामूहिक वनहक्कांतर्गत केलेल्या प्रक्रियेचा फायदा गोंदिया : जिल्ह्यातील वनहक्क प्राप्त ३१ गावांतील तेंदूपत्ता ई-टेंडिरिंगद्वारे लिलाव न करता आपसात ठरवून ्नगृप आॅफ ग्रामसभेने व्यापाऱ्याला विक्री केला. शासकीय दरापेक्षा कमी दरात ही विक्री करण्यात आली असून एकट्या गोंदिया जिल्ह्यात एक कोटी रूपयांच्या घरात नुकसान होण्याची शक्यता वन विभागाच्या सूत्रांनी वर्तविली होती. परंतु पत्रपरिषदेत ही शक्यता फेटाळून लावत यावर्षी तेंदूपत्ता विक्रीत सर्वाधिक नफा होईल, असा दावा ग्रामसभा गृपने केला आहे. सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या महासंघाने (ता. देवरी व सडक-अर्जुनी) दिलेल्या माहितीनुसार, वन हक्क अधिनियम २००६ नुसार पारंपरिक वनहक्क कायद्यान्वये वनहक्क प्राप गावांना, गावांच्या सीमांतर्गत व सीमेबाहेर पारंपरिकरित्या गोळा केलेल्या वन उत्पादनांचा वापर करणे व विल्हेवाट लावणे याचे स्वामित्व हक्क प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार सन २०१२ पासून जिल्ह्यात सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या महासंघाच्या वतीने तेंदूपत्ता संकलन व विक्री केला जात आहे. मात्र सन २०१२ ते २०१६ पर्यंत तेंदूपत्ता खरेदी करणारे कंत्राटदार व वन विभागाचे काही अधिकारी यांच्या संगनमताने महासंघाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षापासून महासंघ तेंदूपत्ता विक्रीसाठी परिश्रम घेत आहे. लाभ मिळावा, मात्र वनक्षेत्राचे नुकसान होवू नये, ही बाब लक्षात घेवून कंत्राटदाराचा शोध घेण्यात आला. यावर्षीसुद्धा मोठ्या दराने कंत्राटदाराला तेंदूचे कंत्राट देण्यात आले. परंतु लाभाच्या प्रक्रियेत काही कंत्राटदार व अधिकारी संगनमत करून महासंघाच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. देवरी व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यात वनहक्क अधिनियमांतर्गत वनहक्क व्यवस्थापन समितींना वनाचे स्वामित्व प्रदान करण्यात आले. वनहक्क समितीच्या महासंघाच्या माध्यमातून तेंदूपत्त्याची विक्री केली जात आहे. पण त्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवरी तालुक्यात १९ व सडक-अर्जुनी तालुक्यात १४ अशा एकूण ३४ वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून स्वामित्व प्राप्त वनक्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन व त्याची विक्री केली जाते. वनहक्क कायद्यान्वये वन उत्पादन गोळा करणे, वापर करणे व त्याची विल्हेवाट लावणे या सर्व बाबींचे अधिकार वनहक्क समित्यांना दिले आहे. यात वन विभागाचा कसलाही हस्तक्षेप राहत नाही. सन २०१२ पासून स्वामित्व प्राप्त वनक्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन करून त्याची विक्री केली जात आहे. परंतु सन २०१६ पर्यंत काही कंत्राटदारांनी महासंघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच सन २०१६ मध्ये नागपूरच्या एका कंत्राटदाराने तेंदूपत्त्याला योग्य भाव देवून खरेदी केली. त्यात महासंघाला चांगला लाभ झाला. महासंघाला होणार लाभ थेट वन समितीचे सदस्य व मजुरांना होतो. मात्र हाच लाभ काही कंत्राटदार व वन अधिकाऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे समजते. त्यामुळेच ते बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. सन २०१७ चे तेंदूपत्ता संकलन व विक्रीचे कंत्राट महासंघाने कमी दरात देवून मोठे नुकसान केले, असा आरोप करण्यात आला होता. मात्र यात काही तत्थ्य नसून उलट यावर्षी सर्वाधिक नफा होईल, असा दावा महासंघाने केला आहे. ज्या विभागाने आजपर्यंत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर अन्याय केले, तेच आता आरोप करीत असल्याचे सांगून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे धुडकावून लावले. पत्रपरिषदेला ग्रुफ आॅफ ग्रामसभाचे अध्यक्ष गोपाल कुमेरी (देवरी), गंगाधर मेश्राम (सडक अर्जुनी), संतराम मडावी (सचिव, देवरी), देवराम सुपारे, मोतीराम सोयाम, अल्ताफ अहेमद पठाण, वासुदेव कुडमेथे (तांत्रिक अधिकारी), तुलाराम उईके, तेजराम मडावी, राधेश्याम कांबळे, ओमप्रकाश लंजे, नंदकुमार डोंगरवार, व्यंकट कुसाम, मोहन ईचामे, कलीराम कुरथेलिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सर्व अधिकार महासंघाला स्वामित्वाप्रमाणे वनहक्क प्राप्त क्षेत्रातील वन उत्पादनांची विक्री कुणाला करावी व कोणत्या प्रक्रियेने करावी, याचे सर्वाधिकार सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या महासंघाला आहेत. त्यामुळे त्यांच्या या अधिकारात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याची कसलीही गरज नाही, असे मत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
तेंदूपत्ता विक्रीत होणार नफा
By admin | Published: March 09, 2017 12:37 AM