बाजारात वीज व्यवस्थेची मागणी
सइक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत.
केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी प्रमुख मार्ग केशोरी गावाच्या मध्य भागातून जात असल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाला असून धोक्याचा बनला आहे. हा रस्ता अरुंद आणि घरे रस्त्याच्या कडेला लागून असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत.
बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
गोरेगाव : शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. या बसस्थाकानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाही. तसेच बस थांबत नाहीत. त्यामुळे बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेला प्रवासी निवारा शोभेची वास्तू ठरत आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज
केशोरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोरोनाचा फैलाव कसा रोखता येईल, यासंबंधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप इंगळे यांनी शुक्रवारी (दि. २) पत्रकार परिषद घेऊन आरोग्य विभागाच्या मदतीला ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात येणार असल्याचे
भंगार बसमुळे प्रवासी त्रस्त
आमगाव : आगारातील भंगार बसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड झाल्यास प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.
स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण
गोंदिया : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे़ स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे़.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. हे झुडूप अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
विडी उद्योगांवर उतरती कळा
गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगाला उतरती कळा लागली आहे. हजारो कामगारांवर उपासमारीचे संकट आहे.