बोंडगावदेवी : मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढा यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी विलास निमजे यांच्याकडे झालेल्या नियोजित बैठकीत निवेदन देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे, सहायक प्रशासन अधिकारी डी. एस. लोहबरे व वरिष्ठ सहायक ए. आर. लिचडे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत, शासन निर्णयान्वये दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी पेन्शन अदालत सभा आयोजित करण्यात यावी व दर महिन्याच्या एक तारीखला सेवानिवृत्त वेतन देण्यात यावे, कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे ६ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत पाठविण्यात यावी. सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे उपदान, अंशराशीकरण, रजारोखीकरण, भविष्य निर्वाह निधी व गटविमा राशी तातडीने अदा करण्यात यावी. सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता रोखीने अदा करण्यात यावा. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तातडीने एकरकमी पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा.
सर्व विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना १०, २० व ३० वर्षांनंतर सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रलंबित वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव, सर्व कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिका सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी व सातव्या वेतन आयोगाचा पहिला-दुसरा हप्ता, कर्मचारी व शिक्षकांचे परीक्षेला बसण्याचे व कार्योत्तर परवानगी अर्ज, त्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अविलंब जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावे. दुय्मम सेवा पुस्तिका अद्ययावत करण्यात याव्यात. सर्व विभागातील कर्मचारी, शिक्षक व अधिकारी तसेच मानधन धारक कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करण्यात यावे. कास्ट्राईब कर्मचारी महासंघासोबत झालेल्या चर्चेची कार्योत्तर प्रत महासंघास अविलंब देण्यात यावी. यासह अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन बीडीओ यांनी दिले.
शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे, दिनेश गेडाम, शिला वासनिक, तालुकाध्यक्ष देवदास मेश्राम, राजेश साखरे, सरचिटणीस गजानन रामटेके, पी. एस. फुलझेले, शशीकुमार तागडे, मोहन नाकाडे, सुरेश फुंडे, टी. पी. गेडाम, के. बी. चाचेरे, एम. एस. खंडाईत, व्ही. जी. पुस्तोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.