गोंदिया : केंद्र सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणामुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. वाढत्या महागाईने गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध नोंदवित महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चुलीवर पोळ्या शेकून मंगळवारी (दि. १३) निषेध नोंदविला. तसेच इंधन दरवाढीच्या विरोधात गोंदिया येथे सायकल रॅली काढण्यात आली.
गोंदिया येथील गांधी प्रतिमा चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण व अभिवादन करून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. जैन कुशल भवन, नया गंज, बॅड लाइन, चांदनी चौक, भवानी चौक, झिरिया मंदिर, इसरका मार्केट, विकास मेडिकल, शनिमंदिर, खादी ग्रामोद्योग, शर्मा रेस्टॉरंट, जैन फर्निचर, नेहरू चौक, हनुमान मंदिर, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौकमार्गे ही सायकल रॅली उपविभागीय कार्यालयात पोहोचली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. महागाई नियंत्रणात आणण्यात यावी, इंधन दरवाढ मागे घ्यावी यासह विविध मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, सचिव अमर वराडे, युवा नेते गप्पू, उषा शहारे, उषा मेंढे, ममता पाऊलझगडे, वंदना काळे, वनिता चिचाम, अनिता मुनेश्वर, रेखा बानेवार, शीला पटले, मनीष मडावी, अल्पेश केशवानी, मनीष लांजेवार, अम्मू शेख, मुकेश पाटील, शैलेश देवधारी, प्रकाश देवधारी, योगेश भेलावे, मनोज कटकवार, नाजूक शेन्डे, अरुणा बहेकार, छब्बू उके, शहर अध्यक्ष जहीर अहमद, ग्रामीण तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, एनएसयूआय अध्यक्ष हरिष तुळसकर यांचा समावेश होता.