अर्जुनी-मोरगाव : महालगाव येथे बुध्दपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहणप्रसंगी वादग्रस्त जागेवर ध्वजारोहण करू नये, अशी भूमिका घेऊन महिलांनी ठिय्या मांडल्याने ध्वजारोहण होऊ शकले नाही. पोलिसांनी या वेळी चोख बंदोबस्त पाळला. महालगाव येथील समाज मंदिराला लागून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या मूर्त्यांची स्थापना करण्यात आली. यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. हा वाद गेल्या सहा महिन्यांपाूसन सुरू आहे. या जागेवर ध्वजारोहण करण्याची परवानगी भाऊराव खोब्रागडे व सहकाऱ्यांनी तालुका प्रशासनाकडे मागितली. या जागेच्या व्यतिरिक्त कार्यक्रम पार पाडण्याची परवानगी दिली. बऱ्याच महिन्यांपासून वाद सुरू आहे. आमच्याकडे कुणीही वरिष्ठ अधिकारी येऊन न्याय देत नाही, असे सांगून कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी दुसऱ्या गटाने भूमिका घेतली. शनिवारी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार होते, मात्र सकाळी ८ वाजताच सुमारे ५० महिला-पुरुषांनी रस्त्याच्या कडेला ठिय्या मांडला व ध्वजारोहण होणार नाही, असे फर्मान सोडले. प्रशासनाने दोन्ही पक्षांना १४९ अन्वये नोटीस बजावली होती. अशी आक्रमक भूमिका बघून खोब्रागडे यांनी तहसीलदारांशी बोलणी केली व कार्यक्रम घरीच करु, वादग्रस्त जागेवर करणार नाहीे, असे सांगितल्याने हे प्रकरण येथेच निवडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त पाळला होता. अखेर दुपारी बंदोबस्त काढून घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)वाद वाढविण्याचा हेतू नाही-खोब्रागडे बौध्दपौर्णिमेला ध्वजारोहण व्हावे यासाठी आम्ही एकत्र झालो. त्याठिकाणी ध्वजारोहण होऊ दिले नाही. आम्हाला वाद चिघळवायचा नाही. आम्ही समाजबांधवांनी घरीच कार्यक्रम पार पाडले. सामंजस्याची भूमिका घेतली. गावात शांतता नांदली पाहिजे. हा वाद निवळल्यानंतर आम्हाला एकमेकांच्या सहकार्याने याच गावात राहून एकमेकांच्या घरचे कार्यक्रम पार पाडायचे आहेत, असे विचार माजी जि.प. सदस्य भाऊराव खोब्रागडे व रामटेके यांनी व्यक्त केले.अद्याप न्याय मिळाला नाही गेल्या सहा महिन्यांपासून समाजमंदिराला लागून मूर्त्यांची अनधिकृत स्थापना करण्याचा वाद महालगाव येथे सुरु आहे. न्याय मिळण्यासाठी गेल्या ३० मार्चपासून तहसील कार्यालय प्रांगणात आमची काही लोक उपोषणाला बसली आहेत. कोणतेही वरिष्ठ अधिकारी आम्हाला न्याय देत नाही. या वादग्रस्त जागेचा न्याय निवाडा त्वरित करावा. जोपर्यंत हा वाद सुरू आहे, तोपर्यंत या जागेवर अशी परवानगी देऊ नये, अद्याप वाद संपलेला नाही, असे मत योगेश मारगाये यांनी व्यक्त केले.
पंचशील ध्वजारोहणासाठी विरोध
By admin | Published: May 23, 2016 1:52 AM