गोंदिया : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवस ठेवून राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ही लोकशाहीची क्रूर थट्टा असून भारतीय जनता पार्टी याचा निषेध करुन महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन पाळत असल्याचे निवेदन सोमवारी (दि. ५) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यातील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा या अधिवेशनात होणार नसून विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार, प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे आदींवर गदा आणली आहे. जनतेच्या प्रश्नाला उत्तरे द्यायला हे सरकार घाबरत असल्याचे स्पष्ट झाल्याने ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. त्यामुळे राष्ट्रपती, राज्यपालांनी याबाबत कठोर भूमिका घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, माजी आ. रमेश कुथे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, किसान मोर्चा महामंत्री अशोक हरिणखेडे, ग्रामीण मंडळ महामंत्री मनोज मेंढे, नेत्रदीप गावंडे, बबली ठाकूर, सोमेश्वर तुरकर आदी उपस्थित होते.