गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढीव बाधितांच्या
प्रमाणात पुढील दिवसात लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा,
असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.
शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर ११०० आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, उपलब्ध असलेले सर्व ऑक्सिजन सिलिंडर भरले असले पाहिजेत. जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरवर जेवणाची, पाण्याची व विजेची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला सावध करण्याचे दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियम व अटीनुसार स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी. आवश्यक कामानिमित्तच घराबाहेर जावे, नियमित मुखपट्टीचा (मास्क) वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले.
............
कोविड केअर सेंटरवरील गैरसोयी त्वरित दूर करा
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र या ठिकाणी दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला योग्य निर्देश देण्यास जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी सांगितले.