गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. अशा संकटमयी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात सर्वतोपरी सोईसुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. खासदार नेते पुढे म्हणाले, कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये कोरोना उपाययोजनेबाबत सर्वतोपरी प्रयत्न करून सोईसुविधा उपलब्ध करून देऊन मनुष्यबळ वाढविले पाहिजे. ग्रामीण भागात रुग्णालयातील बेडची संख्या वाढविली पाहिजे, जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही. ग्रामीण भागात आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. कोरोनाची लस लावणे गरजेचे आहे, त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दक्षता समिती स्थापन करून कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती शिबिर राबविण्याचे निर्देश दिले. बैठकीला आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार केशव मानकर, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी,निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ.प्रशांत तुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते.
.........
अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हे नोंदवा
जे नागरिक लसीकरणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवतात त्यांच्यावर पोलीस विभागाने दंडात्मक कारवाई करावी. गरजू रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाला पाहिजे. ऑक्सिजनचा पुरवठा लवकरच उपलब्ध होणार असल्यामुळे अडचण भासणार नाही. नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करण्यासाठी केंद्रावर जावे, असे निर्देश खा. नेते यांनी यावेळी दिली.