सडक-अर्जुनी : वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली असून यासाठी परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. ३) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशात कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने समाजातील सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी साहित्य कलावंतांना बसला. वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण, सोहळे करीत होते व ते प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी या सर्व कलावंतांना या संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष लायकराम भेंडारकर, भाजप जिल्हा सचिव शेषराव गिर्हेपुजे, भाजप सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष चेतन वळगाये, हभप. मुक्ता हत्तीमारे, खेमराज भेंडारकर, मोरेश्वर मेश्राम, देवचंद कुरसंगे, राजेश पांडे, योगेश शिवणकर, रामू गजबे, दिनेश दरवडे, होमराज लांडे, आशा शिवणकर, उषा काळसर्पे, प्रभूनाथ भोयर, नरेश देशमुख, शालिकराम मरस्कोल्हे यांचा समावेश होता.