बिरसी-फाटा : मागील एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असून, त्याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात लाॅकडाऊनमुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात शासनाने कलावंतांकडे दुर्लक्ष केले आहे. अशात शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलावंतांनी केली असून, आमदार, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
कोरोना या जागतिक महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आली आहे. त्यामुळे कलावंत नियमांचे पालन करीत आहेत. संपूर्ण कार्यक्रम बंद असल्यामुळे त्यांचे हाल होऊन कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी त्यांना आर्थिक मदत देणे, वयोवृध्द कलावंतांना पेन्शन देणे व कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. यासाठी त्यांनी आमदार विजय रहांगडाले, तहसीलदार प्रशांत घोरूडे व पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदन देताना प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाचे कलावंत अध्यक्ष सुनील बिसेन, महासचिव रत्नदीप टेंभेकर, रवींद्र वंजारी, सोनू महाजन, हितेश वालदे, हितेंद्र बावने, किरण वैद्दे, जयंत नंदागवळी, होलिराम जांभूळकर, जयकुमार जांभूळकर, रत्नाकर लांजेवार, भोजराज उरकुडे तसेच अन्य कलाकार उपस्थित होते.