देवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी व सालेकसा तालुक्यांत रस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण व दुरुस्तीकरिता सीआरएफ योजनेअंतर्गत १२५ कोटी ७५ लाख रुपये निधीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना त्वरित मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आ. सहषराम कोरोटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी तालुक्यातील नवेगाव-चिचगड-ककोडी ते राज्य सीमेपर्यंत रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणकरिता ६१ कोटी २० लाख रुपये, तर सालेकसा तालुक्यातील आमगाव-सालेकसा-दरेकसा ते राज्य सीमेपर्यंत रस्ता दुरुस्तीकरिता ६४ कोटी ५५ लाख असे एकूण १२५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सीआरएफ योजनेअंतर्गत दोन्ही तालुक्यांतील मार्गाच्या बांधकामाकरिता मंजुरी देऊन त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आ. कोरोटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. गडकरी यांनी या रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कोरोटे यांना दिले.