देवरी : तालुक्यात जवळपास ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मनोहर सागर, पुजारीटोला व कालीसरार धरणातील कालव्याची लांबी ४५० किमी असून यावर लहान-मोठे २८६६ बंधारे तयार करण्यात आले. या प्रकल्प परिसरात नियमित अतिवृष्टीमुळे मुख्य कालवा व पाणी वितरण प्रणालीमधील मातीची कामे बऱ्याच प्रमाणात विस्कळीत झाली आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. धरण व कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला. पण अद्यापही उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे.
तिन्ही धरण व कालव्याच्या दुरुस्तीकरिता त्वरित निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी आ. सहषराम कोरोटे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदनसुद्धा दिले. बाघ नदीवर मनोहरसागर, पुजारीटोला व कालीसराड हे धरण जवळपास ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले. या धरणाची साठवण क्षमता २२९.३५ दलघमी असून पुजारीटोला धरणातून सिंचनाकरिता डावा कालवा ६० किमी व उजवा कालवा ६५ किमी लांब आहे. सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यातील १६५ गावांतील एकूण ३५७१८ हेक्टर क्षेत्रात सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. यात मुख्य कालवा, शाखा कालवा, पाणी वितरिता लघू व उपलघू कालव्याची एकूण लांबी ४५० किमी एवढी असून यावर लहान-मोठे २८६६ बंधारे तयार करण्यात आले आहेत. प्रकल्पाचे काम बरेच जुने असल्याने त्याची तुटफूट झाली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मनोहर सागर, पुजारीटोला व कालीसरार धरणाचे व कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. या धरणाच्या दुरुस्ती प्रस्तावास विशेष दुरुस्ती विस्तार व सुधारणा अंतर्गत एकूण १३३,७८,५२,४१९ रुपयांच्या निधी खर्चाच्या प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने प्रशासकीय मान्यता दिली. परंतु निधी उपलब्ध नसल्याने सदर धरण दुरुस्तीची कामे सुरू करण्यास विलंब होत आहे. तरी तिन्ही धरणाच्या व कालव्याच्या दुरुस्तीकरिता त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. कोरोटे यांनी केली.