गोंदिया : शहरातील मरारटोली येथे नगर परिषदेच्या मालकीच्या नवनिर्मित व्यापार संकुलामध्ये अपंग कल्याणकारी संघटनेला कार्यालयासाठी एक कक्ष नगर परिषद नियमानुसार उपलब्ध करून द्या, अशी मागणी अपंग कल्याणकारी संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेच्यावतीने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात, अपंगांना त्याच्यासंबंधी योजनांबाबत माहिती देण्यासाठी कार्यालय सुरू झाल्यास अत्यंत सुविधेचे होणार आहे. त्यामुळे मरारटोली येथील व्यापार संकुलात कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर अग्रवाल यांनी, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच त्यांना संघटनेच्या निवेदनासह पत्रही दिले आहे. त्यात त्यांनी, दिव्यांगांसाठी कार्यालय सुरू करणे योजना निश्चितच प्रशंसनीय आहे. मरारटोली येथील व्यापार संकुल ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी सुविधाजनक ठरणार आहे. याकरिता दिव्यांगांना कक्ष उपलब्ध करून त्यांच्या उत्थानासाठी सहकार्य करावे, असे नमूद केले आहे.
निवेदन देणाऱ्यांत संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बंसोड, उपाध्यक्ष शोभेलाल भोंगाडे, सचिव दिनेश पटले, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, तज्ज्ञ संचालक ॲड. संगीता रोकडे, शहर अध्यक्ष विनोद शेंडे, तालुका उपाध्यक्ष योगेश लिल्हारे, शहर सचिव राखी चुटे, अशोक वाढई, हरीश गुप्ता, राजेश ठवकर आदी उपस्थित होते.