परसवाडा : शासनाद्वारे तिरोडा तालुक्यातील पिपरीया घाटावरुन रेती उपलब्ध करुन दिली होती. पण त्या ठिकाणी रेती साठाच संपला आहे. तर खदानीत पाणी भरले आहे. त्यामुळे तालुक्यातील रतनारा, दवनीवाडा, गंगाझरी, धापेवाडा क्षेत्रातील व तिरोडा तालुक्यातील सेजगाव, अर्जुनी, ठाणेगाव, करटी बु. परिसरातील गावासाठी सावरा, अर्जुनी, मुरदाडा, महालगाव, देवरी, किन्ही घाट घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. विजय रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, माजी आ. गोपालदास अग्रवाल व माजी पं. स. सदस्य गुड्डू लिल्हारे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील रेती मिळत नसल्याने हजारो लोकांची घरकुलाची कामे रखडली आहेत. अशातच जिल्हा प्रशासनाने तिरोडा तालुक्यातील मांडवी, पिपरिया घाटावरुन रेती उपलब्ध करुन दिली. मात्र गोंदिया तालुक्यातील रतनारा, दवनीवाडा, दांडेगाव, अर्जुनी, महालगाव, धापेवाडाचे ट्रॅक्टर भाडे ३५०० ते ४ हजार रुपये लागत असल्याने ही रेती घरकुल लाभार्थ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मुरदाडा, महालगाव, देवरी, किन्ही, सावरा, अर्जुनी, कवलेवाडा घाटावरुन रेती उपलब्ध करुन देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी व लोकप्रतिनिधीने केली आहे. या संपूर्ण घाटावर मूबलक प्रमाणात रेती उपलब्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्याने घराची कामे व देयके अडकली आहेत.