बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिरेगावबांध येथे गुरुवारी कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. तपासणीच्या दरम्यान एकाला कोरोनाचे लक्षण दिसून आली. ग्रामस्थांनी सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सजग राहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. घराबाहेर जाणे टाळावे, मास्क नियमित वापरावे. कोरोना चाचणीसाठी स्वयंत्स्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन डॉ.श्वेता कुलकर्णी यांनी केले.
सिरेगाव येथील ग्रामपंचायत परिसरात कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी सरपंच इंजि. हेमकृष्ण संग्रामे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी आरती काळे, आरोग्यसेविका खरले, काटवळे, घनश्याम उरकुडे यांच्यासह आरोग्य पथकांनी गावातील अनेकांची कोरोना तपासणी केली. यामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. औषधीचे वाटपही करण्यात आले. आजघडीला कोरोनाचा फैलाव मोठ्या वेगाने होत आहे. गावकऱ्यांनी मनामध्ये संकोच व भीती ठेवू नये. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे यावे. कोरोनाला हाकलून लावणे, ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. स्वत: सुरक्षित राहण्यासाठी पथ्य पाळणे गरजेचे आहे. गावात गर्दी करू नये. वारंवार घराबाहेर निघू नये. समस्त नागरिकांनी सजगता बाळगून वावरल्यास कोरोनावर विजय मिळविता येतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्रतिबंधात्मक लस देणे सुरू आहे. वयोमानानुसार लस घेण्यासाठी पुढे यावे. स्वत:ची कोरोना तपासणी करावी, अशा सूचना डॉ.श्वेता कुलकर्णी यांनी केल्या.