मुख्यमंत्र्यांकडून कौतुक : जिल्ह्यातील पर्यटन व सारसवर टाकणार प्रकाश गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर आधारीत असलेल्या ‘गोंदिया इसेन्स आॅफ इंडिया’ आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्षावरील ‘सारस वैभव गोंदियाचे’ या दोन्ही माहितीपटाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूरच्या दीक्षाभूमी येथील सभागृहात विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात तालूकास्तरीय आढावा सभेत या माहितीपटांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, उर्जा विभागाचे प्रधान सचिव विपीन श्रीमाळी, सामाजीक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुरेंदकुमार बागडे, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, जलसंधारण सचिव डॉ. पुरूषोत्तम भापकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, जमाबंदी आयुक्त एस.पी. कडू पाटिल, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगा आयुक्त अभय महाजन व गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा तलावांचा व धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा वनराई व वन्यजीवांनी समृध्द असून जिल्हयात नवेगांवबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, हाजराफॉल, चुलबंद, बोदलकसा, मांडोदेवी यासह अनेक पर्यटन व तिर्थस्थळे आहेत. या स्थळांची माहिती राज्यभर व्हावी व जास्तीतजास्त पर्यटक व वन्यजीवप्रेमी पर्यटनासाठी व सारस पक्षांसह वन्य-प्राण्यांना बघण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात यावे यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पर्यटन समितीने तयार केलेला ‘गोंदिया इसेन्स आॅफ इंडिया’ हा माहितीपट १३ मिनीटांचा आहे. या माहितीपटात पाहुणे कलाकार म्हणून प्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनीसुध्दा काम केले आहे.या माहितीपट व वृत्तपटाच्या प्रकाशन प्रसंगी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अन्य यंत्रणांचे अधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)जिल्ह्यातील पर्यटन व सारस पक्षाचे वर्णनजिल्हयातील धानाची शेती, विदेशात निर्यात होणारा उच्च प्रतीचा तांदुळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पातील वनराई-वन्यजीव चुलबंद, बोदलकसा, नवेगावबाध जलाशय, इटियाडोह प्रकल्प, बोदलकसा, चुलबंद, हाजराफॉल तसेच जिल्ह्यातील दंडार ही लोककला, ऐतिहासिक व तिर्थक्षेत्र असलेले कचारगड, मांडोदेवी, तिबेटियन शरणार्थी वसाहत यासह अनेक पर्यटन स्थळांची माहिती ‘गोंदिया इसेन्स आॅफ इंडिया’ या माहितीपटातून देण्यात आली आहे. तर ‘सारस वैभव गोंदियाचे’ या वृत्तपटात सारस पक्षांचे सांैदर्य आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून दिलेली उपमा, ऐतिहासिक काळापासून आदिवासी बांधवांमध्ये सारस पक्षांचे करण्यात येत असलेले पूजन. तसेच मागील वर्षीपासून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेला सारस महोत्सव, सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उभी झालेली लोकचळवळ, पर्यटक आणि पक्षीप्रेमींनी सारस पक्षांना बघण्यासाठी गोंदिया जिल्हयात येण्यासाठी घातलेली साद या वृत्तपटातून सारस पक्षी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.
गोंदियाच्या पर्यटन व सारस माहितीपटाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 12:29 AM