राष्ट्रवादी युवक काँग्रेस : शासनाच्या कार्यप्रणालीचा केला निषेध नवेगावबांध : कोहमारा- वडसा राज्य महामार्गावर कनेरी गावालगत एका लहानशा नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. पावसाळा सुरू होताच सदर पुलाच्या नवीन बांधकामावर मोठे खड्डे पडलेत व चिखल झाला. बांधकाम विभागास जाग यावी म्हणून युवक राष्ट्रवादी काँग्रेस गोंदियाच्या वतीने सदर पुलाच्या चिखलात धानाची रोवणी करुन शासनाच्या बांधकाम प्रणालीचा निषेध नोंदविण्यात आला. कोहमारा-वडसा महामार्ग हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे. दिवसेंदिवस या मार्गावरील वाहतूक वाढतच आहे. मागील तीन वर्षापासून कनेरी गावालगत मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. नवीन पुलावरुन वाहतुकही सुरू करण्यात आली. सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडले व चिखल देखील झाला. पुलावरुन वाहणे नेताना चालकाला कमालीची कसरत करावी लागते. हा पुल वाहनाच्या सोईसाठी बांधण्यात आला असला तरी अपघातप्रवण स्थळ बनला आहे. सदर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अतिशय संथगतीने सुरू असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तरोणे यांनी केला. जनप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांना देखील बांधकाम विभाग केराची टोपली दाखविते, असे त्यांनी सांगितले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून लवकर व गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किशोर तरोणे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष योगेश नाकाडे, सडक अर्जुनीचे अध्यक्ष दिनेश कोरे, आशिष येरणे, अनिल मेहता, पं.स. सदस्य सुशीला हलमारे, गजानन कोवे, रमण डोंगरवार, नरेंद्र लोथे, प्रल्हाद वरडे, आकाश गुप्ता, जागेश्वर मते, यादोराव तरोणे, नरेश जांघडे, सुदेश राखडे, भाष्कर बाळबुद्धे, रवि बडोले, आशिष भेंडारकर, घनशाम चुकारे, धनपाल समरीत आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
पुलावर धान रोवणी आंदोलन
By admin | Published: August 11, 2016 12:10 AM