गोंदिया : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे ०.३० मीटरने व सिरपूरबांध धरणाचे दोन दरवाजे ०.३० मीटर रात्री ९ वाजता उघडण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी सालेकसा, आमगाव, देवरी या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे २ वक्रव्दार ०.३० मीटरने उघडले असून त्यातून १६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर देवरी सिरपूरबांध धरणाचे २ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले असून त्यातून १८४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाने नदी काठलगताच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.