गोंदिया : आपण सत्तेत असो वा नसो जनतेची कामे वेळेत कशी होतील यालाच प्राधान्य दिले. गोंदिया विधानसभा क्षेत्राशी आपले हृदयाचे नाते जुळले आहे. कोरोना संक्रमण काळातसुद्धा जनतेला आरोग्यविषयक सुविधा कशा मिळतील याच दृष्टीने प्रयत्न केले. कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. जे केले तेच सांगितले. मात्र अलीकडे काही लोकप्रतिनिधी स्वत: कामे खेचून न आणता दुसऱ्यांनी आणलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असून, ही बाब लोकप्रतिनिधींसाठी निंदनीय असल्याचे प्रतिपादन माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया जि.प.च्या तत्कालीन अध्यक्ष सीमा मडावी यांच्या कार्यकाळात गोंदिया विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्यात आलेल्या २ कोटी ६२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. ३०) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. भाजप महामंत्री मनोज मेंढे, अर्जुन नागपुरे, देवेंद्र मानकर, देवचंद नागपुरे, सत्यम् बहेकार, सरपंच संजय ठाकरे, कोमल धोटे, दिनेश चित्रे, जीवन बन्सोड, श्याम कावळे, शमिना खान, फरहान शेख, सुनीता मुरकुटे, इंदिरा कटरे, आकाश प्रधान, उषा बावनकर, भारती गावंडे, रवी बाेदानी, सोनल जीवनजा आदी उपस्थित होते. माजी आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात जिल्हा क्रीडा संकुल असो वा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रजेगाव ग्रामीण रुग्णालयासह अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली. यापुढेदेखील गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकासकामे कशी करता येतील यादृष्टीने अजूनही आपले प्रयत्न सुरू आहेत. आपला श्रेय घेण्यावर विश्वास नसून प्रत्यक्षात कामे खेचून आणून ती मार्गी लावण्यावर असल्याचे सांगितले. या वेळी फुलचूरटोला, पिंडकेपार, दासगाव, पांजरा, कासा-बिरसोला, झिलमिल, नागरा-चांदणीटोला, खातिया-आंभोरा- खातिया येथील रस्ता बांधकामासह इतर बांधकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.