लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : धान शेती दिवसेंदिवस तोट्याची होत चालली आहे. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आता शेतकरी नवनवीन प्रयोग करू लागला आहे. धाबेटेकडी आदर्श येथील नंदेश्वर देवाजी सोनवाने या युवा शेतकऱ्यांने दोन एकर शेतीत काटेकोहळाचे उत्पादन घेऊन यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.नंदेश्वर सोनवाने यांच्याकडे १४ एकर शेती आहे. पूर्वापार काळापासून आजतागायत धान शेतीच केली जायची.धान शेतीला लागवड खर्च अधिक आहे. त्या तुलनेत उत्पादन व नफा कमी येतो. सतत परिस्थिती सारखीच. अशात कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पीक बदल करण्याचा सल्ला दिला.२०१७ ला दोन एकर शेतीत काटेकोहळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. काटेकोहळाला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. यापासून आग्राचा लोकप्रिय पेठा मिठाई तयार होतो. शिवाय सोयाबीन वडीसारखी वडी तयार होते. बाजारात याला बरीच मागणी आहे. नागपूर येथील नामांकित हल्दीराम या कंपनीशी काटेकोहळाची उचल करण्याचा करार केला. त्यामुळे बाजारपेठेत आपला माल विकला जाईल किंवा नाही याची जोखीम उरली नव्हती. नंदेश्वर हा स्वत: कृषी पदविका प्राप्त असल्याने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा अभ्यास होताच. त्याने सिंदीपार (सडक अर्जुनी) येथील चंदू शंकर लंजे या नातेवाईकाची भेट घेतली. त्यांच्या शेतात काटेकोहळाची लागवड केलेली होती. ते मागील ८ वर्षांपासून ही शेती करीत आहेत. परिश्रमाने केलेल्या त्यांच्या प्रगतीचा ध्यास घेतला. पिकाविषयी माहिती घेतली. हे पीक वर्षातून तीनदा निघते. याची लागवड साधारणत: मे, सप्टेंबर व जानेवारी महिन्यात केली जाते. यासाठी सर्वात मोठा खर्च मिल्चंग व ठिंबक सिंचन संचाचा आहे. यासाठी दोन एकराला सुमारे दीड लक्ष रुपयांचा खर्च येतो. कृषी विभागातर्फेयोजना राबविल्यास मोठे अनुदान मिळते. शिवाय वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळते. सुरुवातीला काही अडचणी आल्या. काटेकोहळयाचा आकार बघून बाजारात साधारणत: ७ ते १२ रुपये प्रती किलो भाव मिळतो. एक एकरात ३० टन च्या आसपास माल निघतो.एकरभरात तीन महिन्यात दीड लाखाचे उत्पादन होते. लागवड खर्च ५० हजाराचा आहे. एका वर्षात तीनदा पीक निघते. म्हणजे एका एकरात एका वर्षात तीन लाखाचा नफा मिळतो. धान पिकाचा विचार केल्यास वर्षातून दोनदा पीक निघतो. एकरात लागवड खर्च १० हजार आहे. तर उत्पादन ३० हजाराचे निघते. एका वर्षात दोन पीक हंगामात ४० हजार रुपये नफा मिळतो. यामुळे ८ मजुरांना बारमाही रोजगार मिळतो.गुणकारी काटेकोहळाकाटेकोहळा हा दमा, खोकला व मधुमेह इत्यादी विकारांवर गुणकारी असल्याचे आयुर्वेदात म्हटले जाते. हे पीक ९० दिवसात येते. लागवडीनंतर ६० दिवसात फुले येतात. पुढील एक महिन्यात वाढ होऊन तो काढणीस प्रारंभ होतो. यावर पांढरट पावडर चढला की तो काढणीस योग्य समजला जातो. काटेकोहळा १५किलो वजनापर्यंतचा येतो. सोनावाने यांच्याकडे १२ किलोपर्यंतचा काटेकोहळा आहे. कंपनी ५ किलोवरील नगांची खरेदी करते. स्वत:चे अथवा भाड्याचे वाहन करून कंपनीला पोहोचिवला जातो. स्वत:चे जागेत धान शेतीचे क्षेत्र कमी करून काटेकोहळा व टरबूज शेतीसाठी अधिक क्षेत्राचा वापर करण्याचा मनोदय प्रयोगशील शेतकरी नंदेश्वर सोनवाने यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.
भरघोस उत्पादन देणारा काटेकोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 6:00 AM
नंदेश्वर सोनवाने यांच्याकडे १४ एकर शेती आहे. पूर्वापार काळापासून आजतागायत धान शेतीच केली जायची.धान शेतीला लागवड खर्च अधिक आहे. त्या तुलनेत उत्पादन व नफा कमी येतो. सतत परिस्थिती सारखीच. अशात कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पीक बदल करण्याचा सल्ला दिला.२०१७ ला दोन एकर शेतीत काटेकोहळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. काटेकोहळाला आयुर्वेदात फार महत्त्व आहे.
ठळक मुद्देधाबेटेकडीच्या युवा शेतकऱ्याचा प्रयोग: एक एकरी लागवडीतून तीन लाखांचा नफा