सालेकसा : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, नाकेबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
सद्यस्थितीत सालेकसा तालुक्यात १४० च्यावर कोरोना रुग्ण सक्रिय आहेत, तर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. नाकेबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. केवळ अत्यावश्यक सेवा औषधे, रुग्णालय, फळे, किराणा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी इत्यादी सेवांना मान्यता दिली असून, इतर कोणत्याही कारणास्तव घराबाहेर निघाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलीस प्रशासनातर्फे सर्व तालुक्यांतील नागरिकांना केवळ आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा; अन्यथा घरातच सुरक्षित राहा, असे ठाणेदार प्रमोद बघेले यांनी कळविले आहे.