लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धानातील तुटीच्या मुद्द्याला घेऊन जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी तुटीत वाढ केल्याशिवाय धान खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ज्या संस्थांना शासनाच्या अटी, शर्ती मंजूर नाही, त्या संस्थांना वगळून धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धान खरेदीचा तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे.
यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे; पण यंदा नोंदणीलाच १९ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. परिणामी आतापर्यंत केवळ पाचशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे धान खरेदीस सुरुवात झाली नाही.
दिवाळी असल्याने तीन-चार दिवस सुट्या आहेत. त्यामुळे ५ ऑक्टोबरनंतरच धान खरेदी केंद्र सुरू होणार आहे. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे. तर धान खरेदी केंद्र किती लवकर सुरु होतात याकडे शेतकऱ्यांची नजर आहे.
२७८ राईस मिलर्सने केले करारनामे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरुवात झाल्यानंतर त्वरित धानाची उचल करून भरडाई करता यावी यासाठी सुरुवातीपासून धानाची भरडाई करण्याचे नियोजन केले आहे, यासाठी ३८० राईस मिलर्सने अर्जाची उचल केली होती. त्यापैकी २७८ राईस मिलर्सने करारनामे भरूनदेखील दिल्याची माहिती आहे.
पहिल्या टप्प्यात १०० केंद्रे सुरू होणार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा पहिल्या टप्प्यात १०० धान खरेदी केंद्रे सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात एकूण १८५ धान खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. तर आदिवासी विकास महांमडळातर्फे ४५ केंद्रे सुरू केली जाणार आहेत.