लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दिवाळीनंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. गेल्या आठ दिवसांच्या कालावधी मार्केटिंग फेडरेशनच्या ६० धान खरेदी केंद्रावरुन ८५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर हलक्या धानाची लागवड करण्यात आली होती. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करुन दिवाळीपूर्वी धानाची विक्री उधार उसणवारी फेडून सण साजरा करतात. मात्र यंदा हलका धान बाजारपेठ आल्यानंतरही धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करण्याची वेळ आली. मात्र आता दिवाळीनंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सध्या स्थितीत ६० धान खरेदी केंद्र सुरु झाले असून या केंद्रावर आतापर्यंत ८५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाच खरेदीची प्रक्रिया जवळपास सहा महिने चालते मात्र यंदा ही प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले. धान खरेदीतील अडचणी दूर शेतकऱ्यांना त्रासाविना धानाची विक्री करता यावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच मुंबई मंत्रालयात या विषयावर बैठक घेतली. धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सुध्दा धान खरेदी केंद्र वाढविण्याच्या कामी लागला आहे.
धान खरेदी केंद्राची संख्या होणार १३० वर दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. मात्र यंदा धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. जवळपास १३० धान खरेदी सुरु होण्याची शक्यता आहे. धान खरेदी केंद्र मिळण्यासाठी आतापर्यंत १२९ सहकारी संस्थांनी अर्ज केले असून यापैकी २३ सहकारी संस्थांची अर्ज परिपूर्ण असल्याने या संस्थांना धान खरेदीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संजीवनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या केवळ आता नावापुरत्याच शिल्लक राहिल्या आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संजीवनी देण्यासाठी त्यांना सुध्दा हमीभावानुसार धान खरेदी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. लवकरच या संदर्भात पणन विभागाकडून आदेश निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.