बाराभाटी : काळीमाती धम्मकुटी पर्यटनस्थळ हे बाराभाटी-सुकळी-प्रतापगड-गोठणगाव मार्गावर निसर्गसंपन्न रम्य ठिकाणी आहे. या स्थळाकडे लोकप्रतिनिधींचे अजीबात लक्ष नाही. विकास तर नाही, पण स्वच्छतेपासून अलिप्त आहे. अशातच या पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा अशा प्रकारामुळे घसरू नये, अशी मागणी बौद्ध बांधवांची आहे.
या पर्यटन स्थळाला ‘क’ दर्जा प्राप्त झाला असून, येथे अनेक वर्षांपूर्वा स्मृतिशेष भदंत प्रज्ञाज्योती यांनी धम्मकुटी बनविली व येथे बौद्ध समाज बांधवांचे श्रद्धास्थळ तयार झाले, तेव्हापासून आजपर्यंत हे ठिकाण नावारूपास आहे, याचा पण पाहिजे तसा विकास करण्यात आला नाही. येथे अजूनही वीज पोहोचली नाही. या जागेला संरक्षण भिंत नाही, तयार करण्यात आलेल्या उपासकांच्या निवासस्थानाच्या इमारतीच्या निकृष्ट बांधकामामुळे फटी पडल्या आहेत. अनेक इमारतींचा भाग हा कमकुवत झाला आहे. शौचालय व नळफिटिंग हे उत्तम दर्जाचे करण्यात आले नाही व त्यात स्वच्छताही नाही. या स्थळाकडे कुणाचेही लक्ष नाही.
येथे ओला-सुका कचरा असून, उदयी-वाळवीचे मोठे ढीग जमले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. देखभालीसाठी कुणी नसून, हे स्थळ ग्रामपंचायत सुकळी-खैरी अंतर्गत असून, त्यांचेही याकडे लक्ष नाही.
-----------------------
समाज बांधव व समितीचा कानाडोळा
काळीमाती पर्यटनस्थळाचा विकास व्हावा व याला एक वैभव प्राप्त व्हावे, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. समाजातील पुढारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थळ समितीच्या लोकांचा कानाडोळा झाला आहे. अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे या स्थळाचा दर्जा घसरू नये, अशी मनात शंका निर्माण होत आहे. बौद्ध समाज बांधवांचे प्रत्येक कार्यक्रम येथे व्हायला पाहिजेत. विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे व विकासही व्हावा. यासाठी निधी उपलब्ध करून याचा विकास साधावा आणि सर्वोत्तम दर्जा प्राप्त करून द्यावा, अशी मागणी बौद्ध बांधव करीत आहेत.
------------------------
या ठिकाणाचा विकास केव्हा होणार कळत नाही. संबंधित अनेक लोकप्रतिनिधी असूनही त्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न मनात येतो.
- प्रभाकर दहीकर,
सामाजिक कार्यकर्ता, माहुरकुडा क्षेत्र
=====================
येथे सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. पैशांचा चांगला वापर करून विकास करावा व सोईसुविधा निर्माण केल्यास दर्जा उंचावेल.
- दिलवर रामटेके,
सामाजिक कार्यकर्ता, गोठणगाव क्षेत्र.
=================
या स्थळाला बघितल्यास असे वाटते की, याला एक मोठा दर्जा मिळू शकतो, पण विकास व सुविधा नाहीत. कोणाचेही लक्ष नाही, म्हणून ही परिस्थिती असावी.
- धम्मदीप मेश्राम,
गट ग्रा.पं.सदस्य, सुकळी-बोळदे.
----------------------