गोंदिया : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असतानाच शहराला लागून असलेल्या ग्राम कुडवा येथील एका उपेक्षित व वंचित वस्तीवरील महिला-मुलींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या समाजातील मुलींना एकतर दूरवरील पाणी शुद्धीकरण केंद्रातून पाणी आणावे लागत होते किंवा घरोघरी फिरत नळ आल्यावर पिण्याचे पाणी भरू देण्याबद्दल विनंती करावी लागत होती. यावर नाहीच सोय झाली तर गटारीला लागून असलेल्या बोरिंग (हातपंपातून) मधून पाणी भरावे लागत होते. परंतु आता या वस्तीत सार्वजनिक नळ बसविण्यात आले आहे.
या वस्तीत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी करीता ‘पालावरची शाळा’ चालविणारे प्रशांत बोरसे यांनी अनेक उंबरे झिजवले. सामाजिक-राजकीय संस्था व शासन दरबारी पायपीट करून या भीक मागणाऱ्या आणि कचरा गोळा करून पोट भरणाऱ्या वंचित उपेक्षित घटकांची दखल घेण्याची विनंती केली. परंतु कुणीच लक्ष दिले नाही. अनेक प्रयत्नानंतर कुडवा येथील ‘पालावरची शाळे’साठी नेहमीच धावून येणाऱ्या सरपंच श्यामदेवी ठाकरे व युगलकिशोर ठाकरे यांना या समाजाची कीव आली. त्यांनी मांगगारुडी वस्तीमध्ये सार्वजनिक नळाची सोय करून दिली. या कामात ठाकरेंना सामाजिक कार्यकर्ते छोटू पटले आणि ग्रामपंचायत सचिव चौधरी यांनी सहकार्य केले. सायंकाळी नळ बसविल्यावर तत्काळ त्या दिवशी रात्रीच महिलांनी नळाची पूजा करून उद्घाटनाचा आग्रह धरला. यावेळी भटक्या विमुक्त कल्याण परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू बिसेन, मीना बिसेन, पालावरच्या शाळेच्या संचालिका निर्मल बोरसे यांच्या हस्ते नळाचे विधिवत पूजा करून उद्घाटन करण्यात आले.