गोंदिया : मागील १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला तालुक्यातील ७ गावांचा ऑनलाईन सातबाराचा विषय अखेर मार्गी लागला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी या प्रकरणात लक्ष घालून विषय मार्गी लावल्याने या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्र शासनाकडून १५ वर्षांपासून जमिनीचा सातबारा ऑनलाईन करण्याचा निर्णय लागू करण्यात आला होता; मात्र तालुक्यातील कुडवा, नंगपुरा मुर्री, गोंदिया खुर्द, गोंदिया बुजुर्ग, फुलचूर, पिंडकेपार व कटंगीकला या ७ गावांतील हजारो सातबारा ऑनलाईन न झाल्याने या गावातील शेतकऱ्यांना धानाच्या विक्रीपासून अन्य अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत आमदार अग्रवाल यांना माहिती मिळाली असता ते मागील वर्षभरापासून प्रशासकीय स्तरावर बैठका घेऊन प्रयत्नरत होते. परिणामी या गावातील प्रलंबित २८२२१ प्रकरणांतील २८०६७ सातबारा ऑनलाईन करण्यात आले आहेत. हे सातबारा प्रशासकीय स्तरावर चावडी वाचन, आक्षेप, दुरुस्ती प्रक्रियेतून दिवाळी पूर्वी तयार होणार आहेत. तर सध्या सुरू असलेल्या धान खरेदीत ऑफलाईन शेतकऱ्यांचेही धान विकत घेण्याबाबत शासनाला विनंती केल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे.