सडक-अर्जुनी : पशुसंवर्धन विभागात कार्यरत पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा घडवून आणल्याबद्दल व संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याबद्दल पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. २२) आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश चुऱ्हे, पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. परवेज सय्यद व भंडाऱ्याचे अध्यक्ष डॉ. टेंभुर्णे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. यशवंत वाघाये यांनी सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० व ३० वर्षांची कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले असल्याचे सांगितले. यावर आमदार चंद्रिकापुरे यांनी शासनस्तरावर हा मुद्दा उचलून धरून पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. संचालन कार्याध्यक्ष डॉ. महेशकुमार राठोड यांनी केले. आभार डॉ. किशोर मुडे यांनी मानले. कार्यक्रमाला खासगी पशुसेवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. मोहारे, डॉ. सय्यद, डॉ. मोहन डोंगरवार, डॉ. रमेश भांडारकर, डॉ. अंड्रसकर, डॉ. बडोले, डॉ. शेख, डॉ. सुरेश गराडे, डॉ. अमोल डेकाटे, डॉ. हेमंत पिपरेवार, डॉ. स्नेहा कुथे, डॉ. प्रतिज्ञा सतदेवे यांच्यासह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील खासगी व शासन सेवेतील पशू डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.