सालेकसा (गोंदिया) : शनिवारी (दि.१९) बारावी बोर्डाच्या परीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये वगळलेल्या अभ्यासक्रमातून प्रश्न दिल्यामुळे आणि त्याचा अभ्यास न केल्यामुळे परीक्षेत बसलेले विद्यार्थी कमालीचे गोंधळले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ५० टक्के प्रश्न अतिशय कठीण गेले असल्याचे परीक्षार्थ्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
कोरोनाकाळात शाळा-महाविद्यालय वेळेवर सुरू झाले नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातील बराचसा भाग शिकवता येणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेता शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम वगळून त्याशिवाय उरलेल्या अभ्यासक्रमातूनच बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातील, असा निर्णय घेतला होता. परंतु शनिवारी (दि.१९) घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकूण पेपर पैकी २५ टक्के प्रश्न न शिकवलेल्या अभ्यासक्रमातून आल्यामुळे विद्यार्थ्यांना ते प्रश्न सहजरीत्या सोडवता आले नाही.
जेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या विषय शिक्षकांशी याबद्दल विचारणा केली असता ही बाब त्यांच्याही लक्षात आली आणि अभ्यासक्रमातून वगळलेल्या भागातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत समावेश केल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी कमालीचे असंतुष्ट आहेत. ही बाब बोर्डाच्या लक्षात येताच पुढे कोणते पाऊल उचलणार याची प्रतीक्षा करावी लागेल.
पूर्ण गुणदान करावे
परीक्षेदरम्यान जवळपास ५० टक्के प्रश्न विद्यार्थ्यांना कळलेच नाही. त्यामुळे अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेनुरूप गुण मिळणार नाही अशी खात्री वाटत आहे. अशात निकालाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा संपल्यावर जेव्हा संबंधित विषय शिक्षकांनी प्रश्नपत्रिका पहिली तेव्हा त्यांनाही ५० टक्के प्रश्न फारच कठीण स्वरूपाचे दिसून आले. बोर्डाने वगळलेल्या अभ्यासक्रमातून प्रश्न का विचारले हा प्रश्न प्राध्यापकांसमोर सुद्धा उपस्थित झाला असून, बोर्डाने या बाबीचा विचार करून त्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना पूर्ण गुणदान देण्याची मागणी विद्यार्थी, पालक व कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने केली आहे.
अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये संविधान तक्त्याचे पालन केले नाही तसेच कोरोना काळात अध्यापन बरोबर झाले नसता काठीण्य पातळी जास्त होती.
- प्रा. डाॅ. नोहर लिल्हारे, न. प. कनिष्ठ महाविद्यालय, गोंदिया