ऑनलाईन लोकमतसरांडी : मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीचा परिसरातील रब्बी पिकांना तडाखा बसला. सरांडी, उमरी, धादरी, ईसापूर, खोपडा, बयवाडा, विहीरगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, लाखोळी, मूग, उडीद, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून पिकांचे पंचनामे केले. बाधित क्षेत्राचे अवलोकन करुन झालेल्या नुकसानीची माहिती आपल्या वरिष्ठ जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित द्यावी, अशी मागणी पं.स. सदस्य जया धावडे यांंनी केली आहे.या क्षेत्रात यापूर्वीसुध्दा धान, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्यांनी प्रिमियमच्या नावाखाली क्षेत्रात शेतकऱ्यांचे लाखो रुपये लुबाडले. परंतु एकाही शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. याकडे सुद्धा पं.स. सदस्य जया धावडे यांनी लक्ष वेधले.
रब्बी पिके उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 9:48 PM