गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू व्हावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी (दि. १८) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा केली. त्यात येत्या तीन दिवसांत रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले.
रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा सोडून त्वरित धान खरेदीला सुरुवात व्हावी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासंदर्भात मंगळवारी (दि. १८) मंत्रालयात या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला खा. प्रफुल्ल पटेल, आदिवासी विकास आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. खा. प्रफुल्ल पटेल यांनी खरीप हंगाम तोंडावर असून अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीतील धानाची कापणी आणि मळणीदेखील पूर्ण होत आली आहे. अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाणे, खते आणि मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे. मात्र या दोन्ही विभागांच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांना त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सांगितले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा त्वरित धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत केंद्र सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले.