लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर सुध्दा परिणाम होणार आहे. कमी पावसामुळे रब्बीचे लागवड क्षेत्र ३६ हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कृषी विभागाने ७६ हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन केले होते. मात्र कमी पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला मोजकाच पाणीसाठा यामुळे आता केवळ ४० हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या क्षेत्रात सुध्दा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात जून ते सप्टेबर दरम्यान सरासरी ११५० मिमी. पेक्षा अधिक पाऊस होतो. त्यामुळे खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकरी उपलब्ध सिंचनाच्या सोयींच्या मदतीने रब्बी पिकांची लागवड करतात. दरवर्षी तब्बल ७६ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जात होती. मात्र यंदा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यातच पिकांवरील कीडरोगांमुळे शेतकरी हैराण झाले आहे. जिल्ह्यातील लहान, मोठ्या, मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे.यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मिळणार की नाही याची शाश्वती शेतकºयांना नाही. कारण आता रब्बीसाठी पाणी दिल्यास पुढे जाऊन पिण्यासाठी पाणी उरणार नाही. अशात जिल्हावासीयांची पाण्यासाठी भटकंती होणार. त्यामुळे आतापासून जिल्हा प्रशासनाकडून पाणी वाचवाचा नारा दिला जात आहे.म्हणजेच, रब्बीसाठी पाणी दिल्यास जिल्हावासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार यात शंका दिसत नाही. अशात शेती पेक्षा पिण्यासाठी जास्त गरज असल्याने रब्बीसाठी पाणी नाहीच असा फॉमुर्ला अवलंबीला जाणार असल्याचे दिसते. त्यामुळे रब्बी पिकांची लागवड न करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतल्याचे चित्र आहे.धानाचा कटोरा होणार रिताजिल्ह्याची धानाचा कटोरा म्हणून दूरवर ख्याती आहे. मात्र जिल्ह्याला मिळालेली ही उपमा निसर्गाच्या पचनी पडत नाही असेच काहीसे वाटत आहे. कारण, मागील कित्येक वर्षांपासून कधी अत्याधिक पाऊस पिकांचे नुकसान करीत आहे. तर कधी अल्प पावसामुळे पीक दम तोडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील धानाचे उत्पन्न घटत चालले आहे. यंदा खरिपात पाणी व रोगराईने उत्पन्नावर मात केली. त्यात आता रब्बी वांद्यात असल्याने धानाची घट होणार. एकंदर धानाचा कटोरा हळहळू रिकामा होत चालला आहे.
३६ हजार हेक्टरने घटणार रब्बीचे क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:29 PM
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर सुध्दा परिणाम होणार आहे.
ठळक मुद्देकमी पावसाचा फटका : कृषी विभागाचा अंदाज