गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी यंदा गुदामाअभावी चांगलीच लांबली. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली आहे. मात्र अद्यापही जवळपास २० लाख क्विंटल धान खरेदी शिल्लक आहे. त्यातच आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून, खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी न्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केल्यानंतर हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांना हमखास खात्री असते त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री न करता याच केंद्रावर धानाची विक्री करतात. मात्र मागील वर्षी खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची वेळेत उचल न झाल्याने रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली. शासनाने शाळा अधिग्रहित करीत यावर तोडगा काढला. मात्र खरेदी बराच विलंब झाला असून, ३१ जुलैपर्यंत रब्बीतील धान खरेदीला शासनाने मुदतवाढ दिली आहे. मात्र हा शेतकऱ्यांचा अतिशय व्यस्त कालावधी असल्याने आधी रोवणीची कामे करायची की धान विक्री करण्यासाठी पावसाचा धोका पत्कारून शेतात जायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
.............
बोनसचे ७७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. बोनसची अर्धी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.