कराकेशोरी : आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी, संस्था केशोरी, गोठणगाव, इळदा या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमार्फत गेल्या खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची उचल करून उन्हाळी धानपीक आणि मका पिकाची खरेदी सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीकांत घाटबांधे, अरुण मस्के, योगेश पाटील-नाकाडे, दिनेश पाटील-रहांगडाले यांनी केली आहे.
सन २०२०-२०२१ या चालू हंगामातील निघालेले उन्हाळी धानपीक आणि मका पिकाची मळणी करून शेतकऱ्यांच्या हातात पडले आहे. शासकीय आधारभूत केंद्रांमार्फत खरेदी होण्यासाठी यापूर्वीच शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया आटोपली आहे. मात्र अद्यापही आधारभूत केंद्रावर रब्बी धानपीक आणि मका पिकाची खरेदी सुरू झाली नाही. खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्यामुळे केंद्रावर अजूनही धान पडून आहेत. गोदामे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात निघालेली धान व मका पिकाची खरेदी सुरू करण्याचे आदेश नाहीत, असे सांगण्यात आले. या परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक व मका पिकाची लागवड केली होती. सध्या अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करीत धानाचे पीक आणि मका पीक शेतकऱ्यांच्या हातांत आली आहेत. केशोरी, गोठणगाव, इळदा या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना या वर्षीच्या रब्बी हंगामातील धानपीक व मका पीक खरेदी करण्याचे आदेश नसल्यामुळे धान व मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा वेळी खासगी व्यापारी संधीचा फायदा घेऊन कमी भावात शेतकऱ्यांची धानपीक व मका पीक घेऊन पिळवणूक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
............
खरिपाची तयारी अन् धान विक्रीची अडचण
खरीप हंगामाची वेळ शेतकऱ्यांच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. खरीप हंगामातील पूर्वतयारी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. या सर्व बाबींचा विचार करून आदिवासी विकास महामंडळाने त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र केशोरी, गोठणगाव, इळदा यांना आदेश देऊन या परिसरातील शेतकऱ्यांची रब्बी धान पीक, मका पिकाची खरेदी सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य, श्रीकांत घाटबांधे, अरुण मस्के, योगेश पाटील-नाकाडे, दिनेश पाटील-रहांगडाले यांनी केली आहे.