लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी १८८५ मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली. आज ही लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो. यावर्षी १८ वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम 'ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज' म्हणजेच 'रेबीज सीमा तोडणे' असे आहे. रेबीज फक्त कुत्रा चावल्यानेच नव्हे, तर अन्य प्राणी चावल्यानेही होतो. यामुळे वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगीतले.
रेबीजचा प्रसार प्रामुख्याने कुत्रा चावल्याने होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, रेबीज लाईसा विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या चाव्याद्वारे रेबीजचा संसर्ग मानवांमध्ये होतो. हा एक झुनोटिक रोग आहे जो संक्रमित मांजरी, कुत्रे, माकड आणि वटवाघूळ यांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. यामुळे मेंदूला सूजदेखील येऊ शकते. असे मानले जाते की, ९९ टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो.
हे करावे कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेला निर्जंतुक मलम लावा. ताबडतोब शासकीय दवाखान्यात जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज- विरोधी लस घ्या. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करा. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी रेबीजविरोधी लसीकरण करा.
हे करू नयेजखमेला मिरची, तेल, चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावू नयेत.
रेबीज म्हणजे काय आणि त्याचे कारण काय? रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो रँबडोव्हायरस कुटुंबातील आरएबीव्ही विषाणूमुळे होतो. रेबीजचा संसर्ग एखाद्या संक्रमित प्राण्याच्या लाळेतून होतो जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्याला चावतो किंवा ओरखडतो. कारण हा रोग संक्रमित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो, तो त्वरित रोखणे आवश्यक आहे.
रेबीजचे उपचार कोण आणि केव्हा करावे ?रेबीजची लस मारलेल्या रेबीज विषा- णूपासून विकसित केली जाते, ज्यामुळे रोग होऊ शकत नाही. मानवांना रेबीजची लस दोन प्रकारे मिळते. पहिली म्हणजे प्रतिबंधात्मक लस (संसर्ग नसलेली) आणि दुसरी उपचारात्मक रेबीज लसीकरण.
"मांजर, माकडे, वटवाघूळ अशा सर्वच प्राण्यांपासून रेबीजचा धोका असतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. अन्यथा तुमच्या टॉमी किंवा मांजराने चावा घेतल्यावरही होण्याची शक्यता आहे." - डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी