राहुल गांधींच्या हुंकार सभेने बदलणार का समीकरण !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 04:19 PM2024-11-14T16:19:10+5:302024-11-14T16:22:41+5:30

काँग्रेसमध्ये उत्साह : भाजपकडून मोदी की योगींची सभा

Rahul Gandhi's meeting will change the equation! | राहुल गांधींच्या हुंकार सभेने बदलणार का समीकरण !

Rahul Gandhi's meeting will change the equation!

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात आता रंगत आली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमधून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी गोंदिया येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी थेट जनतेच्या प्रश्नांना हात लावत व त्यांच्याशी संवाद साधत एकप्रकारे हुंकार भरला. या सभेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे हा उत्साह मतदारसंघातील समीकरणाची दिशा बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


गोंदिया विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघातील लढतीत दररोज चुरस वाढत आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने जाहीर प्रचारासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रचारसभा, रॅली यातून मैदान मारण्यासाठी दोन्ही उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. 


विशेष म्हणजे मतांचे विभाजन करणारा महत्त्वाचा तिसरा उमेदवार या मतदारसंघात नसल्याने थेट लढत ही अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी होणार आहे. त्यामुळे लढत काट्याची होणार अशी चर्चा या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात असले तरी मतदारांच्या नजरा या दोनच उमेदवारांकडे लागल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी गोंदियात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. मतदानाला सहा दिवस शिल्लक असताना निर्माण झालेला हा उत्साह मतदारसंघाची दिशा ठरविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारानेसुद्धा प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नेमके समीकरण काय तयार होते याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत. 


महायुतीकडून केले जातेय मंथन 
राहुल गांधी यांच्या प्रचारसभेनंतर गोंदिया येथे त्याच तोडीची प्रचारसभा व्हावी यासाठी महायुतीकडून सध्या मंथन केले जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यापैकी कोणाची सभा घ्यावी यासाठी सध्या रणनीती आखली जात आहे.


सभेनंतर निर्माण झालेला उत्साह कायम ठेवण्याचे आव्हान 
राहुल गांधींच्या सभेनंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे हा उत्साह मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेसचे उमेदवार आणि नेत्यांसमोर असणार आहे.

Web Title: Rahul Gandhi's meeting will change the equation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.