गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील आंगण धाबा येथे विना परवानगीने दारू पिणे सुरू होते. त्या ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास धाड घालून २२ जणांना दारूपितांना रंगेहात पकडण्यात आले.
गोंदियाच्या बार असोशिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुसंगाने ही कारवाई करण्यात आली. आंगण ढाबा येथे विनापरवानगी दारू पित असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक डी.बी. काळेल, दुय्यम निरीक्षक गायकवाड, सहाय्यक फौजदार तराटे, जवान डिब्बे, बन्सोड, वाहन चालक भोंडे यांनी धाड घालून त्या ढाब्यात दारू पिणाऱ्या २२ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्या जवळून दारू, बियर, ग्लास, टेबल, खुर्ची जप्त करण्यात आली. आरोपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८, ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.