बोंडगावदेवी : शासकीय आदेशान्वये परवानाधारक देशी दारूचे दुकान बंद असतानासुध्दा अवैध दारू विक्रीला लगाम लागावा म्हणून पोलिसांच्यावतीने धाडसत्र सुरू करण्यात आले. याअंतर्गत अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी महागाव, धाबेटेकडी व कुंभीटोला येथे धाड घालून ४ अवैध दारू विक्रेत्यांकडून दारूच्या १३५ बाटल्या असा तीन हजार ७५४ रुपयांचा माल पकडला आहे.
ठाणेदार महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शखाली पथकाने सोमवारी (दि.१२) ग्राम कुंभीटोला येथील श्यामकिशोर हिरालाल मोहबे (६५) याच्या घरातून एक हजार २०० रुपये किमतीच्या देशीदारूच्या ४० बाटल्या, महागाव येथील राजू मानसिंग पवार (२८) यांच्या घरातून एक हजार ९२४ रुपये किमतीच्या देशी दारूच्या ७४ बाटल्या व धाबेटेकडी येथील आकाश शंकर मेश्राम (२६), राहुल किशोर जांभुळकर यांच्या घरातून ६३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २१ बटल्या असा एकूण तीन हजार ७५४ रुपयांच्या १३५ बाटल्या जप्त केल्या. चारहीजणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या अशा धाडसत्राने अवैध धंदे करणाऱ्यांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. गावांत शांतता भंग करणे, अवैध दारू विक्री यासारख्या असामाजिक गुन्ह्यांच्या प्रकारांची माहिती ताबडतोब अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याला द्यावी, असे ठाणेदार तोंदले यांनी कळविले आहे.