गोंदिया : चंद्रपूर-गोंदिया-बालाघाट-जबलपूर ब्रॉडगेज रेल्वे परियोजनेला मंजुरी मिळाल्याबाबत किंवा हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती किंवा आदेश आमच्याकडे आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. येत्या २ वर्षात सदर रेल्वे रूळ तयार करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र वनकायद्याच्या अडचणी दूर करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली होती असेही प्रशासनाने सांगितले.१९९६-९७ मध्ये प्रस्तावित चंद्रपूर-गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज लाईनकरिता वन जमीन व इतर समस्या उभ्या होत्या. जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रूळामुळे वन्यजीवांना धोका असल्याचे सांगून या योजनेला मंजुरी देण्यात येत नव्हती. झुडपी जंगलावर वन मंत्रालयाचा अधिकार असल्याने या प्रस्तावाला वन मंत्रालय मंजूरी देत नव्हता. या प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल व इतर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. आता केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यासह मध्यप्रदेशातील काही लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयावर दबाव टाकला. यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनीही प्रयत्न चालविले. त्यामुळे वनकायद्यातील अडचणी लवकरच दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दक्षिणेतूृन उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या नागपूर ते इटारसी जातात. या गाड्यांना ४०० किमीचा प्रवास म्हणजेच १० तास वाया घालवावे लागतात. हा लांब पल्याचा प्रवास वाचविण्यासाठी चंद्रपूर-गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज तयार करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. चंद्रपूर ते गोंदिया व जबलपूरदरम्यान कटंगीपर्यंत छोटी रेल्वेलाईन टाकण्यात आली. सध्या या रुळावरून लोकल गाडीच्या पाच फेऱ्या धावत आहे. वन कायद्याच्या अडचणी दूर झाल्यास लाखो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. गोंदिया व चंद्रपूरसह दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना ही योजना जबलपूर, इलाहाबाद, बनारस, सारनाथ व बौध्द गया येथे लवकर पोहोचता येईल. बालाघाट ते नैनपूर दरम्यान जंगलाचा भाग जास्त आहे.
ब्रॉडगेज रेल्वे मार्गाबाबत रेल्वे प्रशासन अनभिज्ञ
By admin | Published: August 21, 2014 11:57 PM