गोंदिया : रेल्वेगाड्यामधून प्रवाशांचे मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. चोरट्याकडून महागडे मोबाईल जप्त केले आहे.
३ मे रोजी गोंदिया ते वर्धा धावणाऱ्या गाडी क्रमांक ०२२८० हावडा-पुणे एक्स्प्रेसच्या मागील जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मोाबाईल पळविण्यात आला. आरोपीने त्या प्रवाशासोबत जवळीक साधून मोबाईल हिसकावून चालत्या गाडीतून उडी मारली. यासंदर्भात ४ मे रोजी गोंदिया रेल्वे पोलिसांत भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर भिमटे त्यांनी गाडी क्रमांक ०२२५९ गीतांजली एक्स्प्रेसमध्ये आरोपी संकेत दीपक गुप्ता (३०) रा. तेलीपुरा, टेकडी रोड, सीताबर्डी दुर्गा मंदिर, अभिषेक हॉटेलजवळ सीताबर्डी, नागपूर याला अटक केली. त्याच्याजवळून एक लाख रुपये किमतीचे १० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. गोंदिया रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे १२ तासाच्या आत या आरोपीला एक लाख रुपये किमतीच्या मोबाईलसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजकुमार, पोलीस उपअधीक्षक एस.व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्याच्या ठाणेदार अनिता खेडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार विनोद धांडे, ओम प्रकाश सेलोटे, नंदकिशोर नारनवरे, चंद्रकांत भोयर, अखिलेश राय, कुणाल गिरणातवार, संतोष चोबे यांनी केली.
बॉक्स
६ वर्ष ६ महिन्याचा सश्रम कारावास
गोंदिया रेल्वे पोलिसांनी १० मोबाईलसह अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी, नागपूर, वर्धा या ठिकाणी चोरी केल्यामुळे या आरोपीला यापूर्वी नागपूर रेल्वे न्यायालयाने ६ वर्ष ६ महिन्याचा कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यापैकी ४ वर्षे त्याने शिक्षा भाेगली होती. तो रेल्वेतील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.