गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला रेल्वे पोलिसांनी सोमवारी (दि.२४) दुपारी अटक केली. संजू मंगल बेहरा (३५, रा. तरुणनगर, कालीमाता वाॅर्ड क्रमांक-३० पंडितराई रायपूर, छत्तीसगड), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोंदिया रेल्वे पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना त्यांना संजू बेहरा संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन जाताना आढळला. फलाट क्रमांक-१ वर उभ्या असलेल्या रायपूरकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तो चढण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी त्याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याजवळ २०००, ५००, २०० व १०० रुपयांच्या भरपूर नोटा आढळल्या. त्या नोटांची मोजणी केली असता १४ लाख ७४ हजार ३०० रुपये रोकड असल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई रेल्वे पोलीस ठाण्याच्या ठाणेदार अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार अरुण गोंधळे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सेलुटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय यांनी केली. या रकमेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.